'मेट्रो 2 ब'मधून कुर्ला मेट्रो स्थानक वगळले, नागरिकांच्या सूचना-हरकती न मागवता आराखड्यात बदल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बातमी
डी एन नगर ते मंडाले मेट्रो 2ब प्रकल्प एमएमआरडीएकडून उभारण्यात येत आहे. या मेट्रो मार्गाच्या आराखड्यात कुर्ला मेट्रो स्थानकाचा समावेश होता. पण आता मात्र हे स्थानक मेट्रो 2 ब मधून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना पत्र लिहून याविषयी तक्रार केली आहे.
मुंबई -डी एन नगर ते मंडाले मेट्रो 2 ब प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)कडून वेगात सुरू आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहेच. पण त्याचवेळी कुर्ला येथे मेट्रो स्थानक येणार असल्याने हा कुर्लावासीयांसाठी मोठा दिलासा मानला जात होता. पण आता मात्र कुर्लावासीयांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण मेट्रो 2 ब मधून कुर्ला मेट्रो स्थानक वगळण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बदल आराखड्यात करताना एमएमआरडीएने कुर्लावासीयांना विचारात घेतलेले नाही की यावर सूचना-हरकती मागवलेल्या नाहीत. त्यामुळे एमएमआरडीएच्या या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.