मुंबई -विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भारतीय जनता पक्षाचे प्रसाद लाड यांच्यात चुरशीची लढत आहे. दोघांनाही अपक्षांच्या मतांची गरज लागणार आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या सर्व जागा जिंकून येतील, असा दावा एकीकडे घटक पक्षातील सर्वच नेते करत असले तरी काही उमेदवारांना पक्षांतर्गत विरोध होताना दिसतो आहे.
MLC Election 2022 : भाई जगताप यांना पक्षातूनच अंतर्विरोध
काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार भाई जगताप यांना पक्षातूनच अंतर्विरोध होत असल्याची खात्रीलायक माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यातील टक्कर आता अधिक रंगतदार होणार आहे.
भाई जगताप यांना प्रदेशाध्यक्षांचाच विरोध? -काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि विधान परिषदेचे उमेदवार भाई जगताप हे अपक्षांची मते मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. पक्षातील आमदारांची मतेही आपल्याला मिळावीत यासाठीही ते प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्व पक्षांमध्ये मित्र असलेल्या आणि मुंबई काँग्रेसमध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप पाडत असलेल्या भाई जगताप यांनाच नाना पटोले यांच्याकडून विरोध असल्याची चर्चा सुरू आहे.. भाई जगताप हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गटाचे उमेदवार असल्याचे मानले जाते त्यामुळे नाना पटोले यांचा पक्षांतर्गत गट नाराज आहे. काँग्रेसमधील या अंतर्विरोधाचा फायदा घेण्यासाठी प्रसाद लाड आणि भाजपने आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाई जगताप यांची लढाई अधिक कठीण होणार का, असा सवाल आता पक्षातीलच नेते आपापसात करत असल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.