मुंबई -आज मराठा क्रांती संघर्ष समितीतर्फे मराठा समाजामध्ये आरक्षणासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी मुंबईमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समन्वयक राजन घाग यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या बाईक रॅलीमध्ये भाजपच्या आमदारांनी हजेरी लावलेली होती. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप सहयोगी पक्षाचे आमदार शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी या बाईक रॅलीला उपस्थिती दर्शवली होती.
बाईक रॅली सायन सोमय्या ग्राउंडपासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत काढण्यात आली होती. या बाईक रॅलीमध्ये हजारो मराठा युवकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या दरम्यान मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था केली असल्यामुळे या बाईक रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या सर्व बाईक रॅलीनंतर शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी महाविकास आघाडीवर मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करत टीका केलेली आहे.
सर्वपक्षीय आमदारांची बैठक -
विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज मुंबईमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून मराठा आरक्षण मिळण्यासाठी व इतर सोयी मिळवण्याकरता जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन केलेले होते. या बाईक रॅलीला हजारोंच्या संख्येने मराठा युवक सहभागी झाले होते. मुंबईसारख्या शहरात या बाईक रॅलीला पोलिसांनी जे सहकार्य केलेले आहे. त्यासाठी आम्ही आभारी आहोत. मराठा आरक्षणा संदर्भात अधिवेशनात जर काही निर्णय झाला नाही तर आम्ही महामोर्चा काढणार आहोत. हा महामोर्चा पूर्वनियोजित असेल. जर सरकारने अधिवेशनाच्या अगोदर काही निर्णय घेतले नाहीत तर 4 आणि 5 जुलैला मराठा समाजाच्या आमदारांची बैठक घेण्याच्या विचारात आम्ही आहोत आणि या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रण देणार आहोत. मराठा समाजाची न्यायालयीन लढाई आणि राज्य सरकारची जबाबदारी या सगळ्या संदर्भात आम्ही विस्तृत पद्धतीने आमदारांना टिपणी देणार आहोत. हा प्रश्न राजकीय न करता या प्रश्नासाठी अधिवेशनामध्ये आपण आवाज उठवावा, यासाठी आग्रह करणार आहोत.