महाराष्ट्र

maharashtra

'राज्यातील युवकांना हवं फक्त हक्काचं व्यासपीठ' आमदार रोहीत पवारांची ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत

By

Published : Jun 5, 2020, 11:19 PM IST

राज्यातील वाढते कोरोनाबाधित रुग्ण, राज्यातील शिक्षण क्षेत्रासंबंधीत असलेले प्रश्न आणि आगामी काळातील राज्य सरकारची ध्येय-धोरणे आदी विषयांबाबत कर्जत-जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीतील युवा नेते, आमदार रोहीत पवार यांनी ईटीव्ही भारतला दिलेली विशेष मुलाखत.

MLA Rohit Pawar
आमदार रोहित पवार

हैदराबाद - महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे देशातील सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे पक्ष सहभागी आहेत.

याच पार्श्वभीमूवर, राज्यातील वाढते कोरोनाबाधित रुग्ण, राज्यातील शिक्षण क्षेत्रासंबंधीत असलेले प्रश्न आणि आगामी काळातील राज्य सरकारची ध्येय-धोरणे आदी विषयांबाबत कर्जत-जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीतील युवा नेते, आमदार रोहीत पवार यांच्यासोबत ईटीव्ही भारतने बातचीत केली.

आमदार रोहीत पवार यांनी यावेळी त्यांना विचारलेल्या अनेक प्रश्वांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. तसेच कर्जत-जामखेड या स्वतःच्या मतदारसंघात कोरोना प्रसार रोखण्यासाठी केलेले काम, राज्य सरकारने कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजना, राज्यातील शैक्षणिक घटकाबाबत निर्माण झालेले अनेक प्रश्न आणि वादातीत मुद्दे यांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.

आमदार रोहित पवार यांची ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत...

हेही वाचा...ईटीव्ही भारत Exclusive : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत...

कोरोनामुक्तीचा कर्जत जामखेड पॅटर्न.. चर्चेपेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्वाचे

कर्जत जामखेडमध्ये कोरोनाचे १७ रुग्ण आढळले होते. आता तो परिसर कोरोनामुक्त झाला आहे. जामखेड शहरात 60 ते 70 हजार नागरिक राहतात. तिथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने काही ठोस पाऊले उचलली. त्यामुळे 45 दिवसांत ती साखळी तोडता आली. त्यानंतर काही वेळा कर्जतमध्ये लोक लपूनछपून येत होते. त्यामुळे सहा महाविद्यालयांमध्ये त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले. सध्या मागील 7 ते 8 दिवसात येथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या प‌ॅटर्नची इतरत्र चर्चा झाली नसली. तरीही नागरिकांचे आरोग्य आणि जीव वाचत आहेत. हे महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहीत पवारांनी दिली.

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने विचारपूर्वक घेतला...

सध्या राज्यात अंतिम वर्षांच्या परिक्षा घेण्यावरुन वातावरण तापलेले आहे. मात्र, अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याची सरकारने घेतलेली भूमिका विचारपूर्वक आहे. राज्यात ठिकठिकाणी पालक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासोबत चर्चेनंतर महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला होता, असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयात विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यात कोणाला आपली श्रेणी वाढवून घ्यायची असेल, तर परीक्षेचा पर्याय दिला असल्याचेही, रोहीत पवार यांनी सांगितले आहे.

परीक्षा लांबणीवर टाकणे तसे योग्य असणार नाही...

परीक्षा रद्द ऐवजी परीक्षा लांबणीवर टाकता आली नसती का ? या प्रश्नावर बोलताना रोहीत पवार यांनी, एक शैक्षणिक चक्र आणि प्रक्रिया असते. ज्यात काही विद्यार्थ्यांना इतर देशात जायचे असते अथवा राज्यात. अशावेळी त्यांचा विचार करणे आवश्यक असते, असं पवार यावेळी म्हणाले. तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेतला होता, असेही रोहीत पवार यावेळी म्हणाले.

शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय सर्व विचाराअंतीच घेतला जाईल...

सध्या शाळा सुरू करण्याची घाई होत आहे. असे वाटणे साहजिक आहे. यातून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, हेही खरेच आहे. परंतु आरोग्य आणि अर्थव्यवस्था याची सांगड घालावी लागते. मंत्री वर्षा गायकवाड या यावर सखोल विचारविनिमय करुनच निर्णय घेतली. तसेच ऑनलाईन शिक्षणाचा देखील विचार केला जात आहे. त्यामुळे शाळा सुरु करणयाबाबत लगेचच निर्णय न होता, पुर्ण विचाराअंती निर्णय घेतला जाईल, असे आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील तरुणांनी आता संधीचे सोने करुन नोकऱ्या मिळवल्या पाहिजे...

सध्या कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यात अनेकांच्या हातातील रोजगार गेला आहे. महत्वाचे म्हणजे पुणे मुंबई सारख्या शहरात काम करणारे असंख्य मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील नोकऱ्या नसणाऱ्या तरुणांना ही संधी असल्याचे, आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील तरुणांना हवं त्यांचे हक्काचे व्यासपीठ...

सध्याच्या सरकारमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. यात आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, झिशान, ऋतुराज पाटील यांची नावे घेतली जातात. या तरुण आमदारांकडे राज्यातील तरुणांसाठी काही धोरण आहे का, याबाबत रोहीत पवार यांना विचारले असता त्यांनी या विषयावर नेहमीच विचारविनिमय आणि काम करत असल्याचे सांगितले.

'आम्ही सर्व युवा आमदार ज्येष्ठाकडून मार्गदर्शन घेत असतो. सध्या वैयक्तिकरित्या मतदारसंघात रोजगार मेळावे घेत आहोत आणि ऑनलाईन मुलाखती घेत आहेत. महत्वाचे म्हणजे राज्यातील युवकांना आज फक्त त्यांचे हक्काचे व्यासपीठ देण्याची गरज आहे. व्यवसाय, कला, शिक्षण कोणत्याही क्षेत्रात राज्यातील युवक निपुण आहेत. त्यांना फक्त हक्काचे व्यासपीठ हवे आहे. जिथे कोणाच्याही पाठपुराव्याची गरज न पडता यंत्रणेतून त्यांची कामे होतील, अशी व्यवस्था निर्माण करायाची असल्याचे' आमदार रोहीत पवार यांनी यावेळी सांगितले.

राम शिंदेंचा राष्ट्रवादी प्रवेश ही फक्त चर्चा... यात तथ्य नाही

राम शिंदे आणि माझी फक्त दोनदा भेट झाली. यात कोणतीही राजकीय बातचीत झाली नाही. समाजमाध्यमावर सुरु असलेल्या चर्चा निरर्थक आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातमीत काही तथ्य नाही, असेही रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...'ईटीव्ही भारत' विशेष: 'विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे'

ABOUT THE AUTHOR

...view details