मुंबई - मुलुंडमध्ये कोरोना रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या 600 च्या वर गेली आहे. संख्या आटोक्यात यावी आणि उपचार लवकर मिळावेत, यासाठी मुलुंडमध्येच रिचर्डसन & क्रुडास येथे 1800 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. मात्र, मुलुंड जकातनाका येथे उभारलेले 120 खाटांचे कोविड सेंटर पहिले सुरू करा, अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे.
तयार असलेले कोविड सेंटर आधी सुरू करा, मग 1800 खाटांचे सेंटर बघा - आमदार कोटेचा - मुलुंड कोविड सेंटर बातमी
मुलुंड जकातनाका येथे उभारलेले 120 खाटांचे कोविड सेंटर पहिले सुरू करा, अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे.
मुलुंड परिसरामध्ये जकात नाक्यावर 3 आठवड्यांपूर्वी बनवण्यात आलेले 120 खाटांचे कोविड केअर सेंटर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसल्यामुळे अद्यापही सुरू झालेलं नाही. त्यात 1800 खाटांचे नवीन कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मुलुंड आणि भांडुप मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना तयार करण्यात आलेले कोविड केअर सेंटर त्वरित सुरू करावेत, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.
मुलुंडमध्ये तिसरे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. पण माझा थेट प्रश्न शासनाला आहे की आपण सेंटर उभारत आहात, पण ते चालवण्यासाठी मेडिकल टीम कुठे आहे. मुलुंड जकातनाका येथील सेंटर 20 मे पासून तयार आहे. मात्र, तिथे मेडिकल टीम उपलब्ध करून न दिल्यामुळेंते सेंटर अजून सुरू झाले नाही. दुसरीकडे, मिठागर येथील शाळेत असलेल्या सेंटरमध्ये सध्या 200 खाटा आहेत. या खाटा अजून 100 ने वाढवता येतील. यासाठी सगळे साहित्य रेडी आहे. मात्र, मेडिकल टीम नसल्यामुळे वाढवता येत नाही. यामुळे जर 120 खाटाच्या सेंटरसाठी आरोग्य यंत्रणा नसेल तर 1800 खाटाच्या सेंटरसाठी मेडिकल टीम कशा आणणार, असा प्रश्न कोटेचा यांनी उपस्थित केला आहे.