मुंबई -राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होत आहे. सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत चाळीसगाव अमळनेरचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी आज विधानभवनात अनोख्या वेशभूषेत प्रवेश केला. 'सरकार हरवलं आहे, हे सरकार वसुली सरकार आहे' या आशयाचे शब्द लिहिलेला सदरा त्यांनी परिधान केला होता.
जनतेच्या प्रश्नावर सरकार अपयशी -
महाविकास आघाडी सरकार जनतेच्या प्रश्नावर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. राज्यात विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असताना सरकार त्यावर जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून टाकण्यात आले आहेत. शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. सर्वसामान्य जनतेचा या सरकारवर विश्वास राहिला नाही. मुख्यमंत्री अधिवेशनात यायला तयार नाहीत. हे सरकार हरवले आहे. वसुली करण्यात सरकार मग्न आहे, असे सांगत हे सरकार अधिवेशनही घ्यायला तयार नाही, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं.
विरोधक सरकारला चांगलेच कोंडीत पकडत असल्याचे दिसून येत आहे. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर परीक्षांमधील गैरप्रकारावरुन आंदोलन ( Protest in assembly winter session maharashtra 2021 ) सुरू केले आहे. भाजपा आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारला घेरले.