मुंबई- मुलुंडमध्ये रिचर्ड सन्स अँड क्रूडास या कंपनीच्या आवारात सिडकोने तयार केलेल्या 1650 बेडच्या कोविड सेंटर त्वरित चालू करावे, अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या सेंटरचे लोकार्पण तर झाले पण सुरू कधी होणार, असा प्रश्न कोटेचा यांनी उपस्थित केला आहे. या सेंटरमध्ये आयसीयू, डायलेसिस सेंटर तयार करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या सेंटरमध्ये 215 आयसीयू बेड आणि 75 डायलेसिस बेड यांची उपाययोजना करण्यात आली होती. परंतु कंत्राटदारांनी या सुविधा उपलब्ध केल्या नाहीत याकडे कोटेचा यांनी लक्ष वेधले आहे. पूर्व उपनगरात दिवसेदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही हे सेंटर सुरू झालेले नाही. 3 जुलै रोजी याचे लोकार्पणही झाले. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येथील सेवा-सुविधांची पाहणी करण्याकरीता मंगळवारी या सेंटरला भेट दिली. तेथील व्यवस्था पाहून मला धक्का बसला, असे कोटेचा यांनी सांगितले.