मुंबई -राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या पक्षाची ३ मत कुणाला देणार? हे अद्याप गुलदस्त्यात ठरवल्याने या निवडणुकीची रंगत अजून वाढली ( MLA Hitendra Thakur about MLC election ) आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत कधी नाही ती चुरस निर्माण झाली आहे. अशात अपक्षांच्या मतांना भाव आला आहे. त्यातही ३ आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे शिवसेना आणि भाजपचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू ठेवले. असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही फोन करून हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता बविआच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
ठाकूरांना मनवण्यासाठी बरेच प्रयत्न! - निवडणूक जाहीर झाल्या नंतर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्या नंतर शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊत यांनीही सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ठाकूर यांची भेट घेतली होती. भाजपचे संकट मोचक आमदार गिरीश महाजन यांनीही ठाकूर यांची भेट घेतली. आघाडीचे शिष्टमंडळ ठाकूर यांना भेटायला आले होते. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे माजी खासदार अशोक मोहोळ, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांचा समावेश होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही फोन वरून चंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. तरीही हितेंद्र ठाकूर यांनी आपले पत्ते अजून ओपन केले नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत ही उत्कंठा राहणार आहे. निवडणूक राज्यसभेची असली तरी सद्या या निवडणुकीचे केंद्र बिंदू हे वसई तालुका झाले आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी भोवती राजकारण फिरत आहे. शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार उभा केल्याने निवडणूक अटीतटीची झाली असल्याने एकेक मतांसाठी भाजप आणि मविआ हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहे.