महाराष्ट्र

maharashtra

'कमळ' हाती घेता घेता, आमदार भारत भालकेंनी हातात बांधले  'घड्याळ'

By

Published : Oct 1, 2019, 7:59 AM IST

काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही, अशी खुणगाठ मनाशी बांधून भाजपचे कमळ हाती घेण्याच्या तयारीत असलेले काँग्रेसचे पंढरपूर येथील आमदार भारत भालके यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले आहे.

भारत भालके

मुंबई -विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठे प्रस्थ असणारे आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

सोमवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या मेगाभरतीत काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि आमदार सिद्धराम म्हेत्रे या दोघांचेही नाव अग्रक्रमाने घेण्यात येते होते, परंतु ऐनवेळी त्यांना भाजपाने नकार दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे भालकेंनी सायंकाळपर्यंत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोणताही गाजावाजा न करता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हेही वाचा... MAHA VIDHAN SABHA : महाराष्ट्रात सत्तांतर व शिवसेना-भाजप युतीची सत्ता.. राज्यात पहिल्यांदाच ब्राम्हण मुख्यमंत्री

माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या दरम्यानच आमदार भारत भालके आणि सिद्धराम म्हेत्रे हे भाजपामध्ये प्रवेश करणार होते. त्यासाठी त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द भाजपाकडून देण्यात आला होता. मात्र मध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहीते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने भालके यांचा भाजपा प्रवेश लांबणीवर पडला होता. त्यानंतरच्या काळात भालके यांचा विषयच दूर गेल्याने आणि दुसरीकडे काँग्रेसकडून तिकिट नाकारले जाईल, या शक्यतेमुळे आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भारत भालके

भालके यांनी एसडब्ल्यूपी या स्थानिक आघाडीतून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नेते व आता भाजपात गेलेले विजयसिंह मोहीते पाटील यांचा दारूण पराभव केला होता. तर २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवून एसडब्ल्यूपीमधून उभे राहिलेल्या प्रशांत परिचारक यांचा पराभव करून आमदार झाले होते. यावेळी ते भाजपाच्या वाटेवर जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र त्यासाठी त्यांनी दुजोरा दिला नव्हता.

हेही वाचा... पीएमसी बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

पंढरपूर मतदार संघात भाजपात गेलेले प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये गेलेल्या विजयसिंह मोहीते पाटील यांच्यामुळे भालके यांना भाजपात येण्यापासून रोखण्यात आल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे पंढरपूरची जागा ही शिवसेनेच्या समाधान औताडे अथवा युतीतील मित्र पक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला सोडली जाण्याची शक्यता असून त्यावर माजी आमदार व एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर‍ परिचारक यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे सोमवारी राष्ट्रवादीत आलेले भारत भालके हे, मंगळवारी पंढरपूर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details