महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bharat Bandh : महाराष्ट्रात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद - भारत बंद बातमी

आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. यासंदर्भातला 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

Bharat Bandh
महाराष्ट्रात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

By

Published : Dec 8, 2020, 7:01 PM IST

Updated : Dec 8, 2020, 7:35 PM IST

मुंबई -केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. यासंदर्भातला 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

प्रतिनिधींनी मुंबईतील भारत बंदचा घेतलेला आढावा

हेही वाचा -आता देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही; उद्याच्या बैठकीत केंद्राने 'हा' निर्णय जाहीर करावा - शेट्टी

  • राज्यातील स्थिती -

राज्याची उपराजधानी नागपुरात भारत बंदचा कुठलाही प्रभाव दिसून आलेला नाही. मात्र, शीख समाजाकडून नागपूर कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात जोरदार प्रदर्शन करण्यात आले होते. सोलापुरात या बंदला हिंसक वळण लागले. माकपच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये पोलिसांनी मारहाण केली. मुंबई शहरात भारत बंदचा खास परिणाम दिसून आलेला नाही. मुंबईतील बँकांचे व्यवहार नेहमीसारखे सुरू होते. बँकिंग जिल्हा या परिसरामध्ये सरकारी व खासगी बँकांची कार्यालये असून, भारत बंदचा कुठलाही प्रभाव येथील व्यवहारांवर आढळून आला नाही. मुंबईतल्या सीएसएमटी परिसरामध्ये बहुजन समाज पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.

मुंबईत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

हेही वाचा -भारत बंद : मुंबईत संमिश्र प्रतिसाद, बीएसपी कार्यकर्त्यांचे आंदोलन

मुंबईतील रिगल सिनेमासमोर असलेल्या लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. मोदी हटाव देश बचाव, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. कृषी कायदे हे मुळात धनदांडग्या आणि मुठभर लोकांच्या हितासाठी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. कोल्हापुरातील शिवसैनिकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी रॅली काढली. जे कायदे आम्ही मागितलेच नाही, ते आमच्यावर का लादले गेले, असा सवाल शिवसैनिकांनी केला. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 15 टक्के मालाची आवक झाली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज पहाटेपासून शुकशुकाट पाहायला मिळाला. बळीराजाला साथ देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा बंद होत्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, माथाडी मापाडी, तसेच इतर घटकांनी शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन केले.

  • मुंबईत बेस्टच्या ८४ टक्के तर एसटीच्या ३२ टक्के बस रस्त्यावर

आज बंद दरम्यान मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी नैतिक पाठिंबा देत बंदमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला होता. तरीही आज बेस्टच्या ८४ टक्के तर बेस्टच्या मदतीसाठी चालवल्या जाणाऱ्या एसटीच्या ३२ टक्के बस रस्त्यावर प्रवाशांची ने आण करण्यासाठी रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.

  • मुंबईत लोकल सुरळीत मात्र, प्रवासी कमी

कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. या दरम्यान, मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सेवा मात्र सुरळीत चालताना दिसत आहे. भारत बंदचा रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, रेल्वे स्थानकात आणि रेल्वेत प्रवासी संख्या तुरळक होती.

  • डब्बेवाल्यांचा भारत बंदला पाठिंबा -
    डब्बेवाल्यांचा भारत बंदला पाठिंबा

केंद्र सरकारने केलेला कायदा हा देशाच्या पोशिंद्याला मारक आहे. त्यामुळे या बंदला आम्हीदेखील पाठिंबा देत आहोत, असे मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. कोरोना आणि बेरोजगारीची परिस्थिती आहे. त्यामुळे देशातील कामगार संपणार अशी स्थिती आहे. केंद्रात जे कायदे झाले आहेत, त्यामुळे देशातील शेतकरीही संपणार आहे. उत्तर भारतात याविरोधात आंदोलन झाले आणि आज बंदचे आवाहन त्यांनी केले याला आम्ही पाठिंबा देत आहोत, असेही ते म्हणाले.

  • अण्णा हजारेंचे राळेगणसिद्धीत एकदिवसीय उपोषण
    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आज राळेगणसिद्धीतील गांधी पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन करत आहेत. सध्या दिल्लीत सुरू असलेले आंदोलन हे महत्वाचे आहे. देशभरातून त्याला पाठिंबा मिळत आहे. सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहून त्यातून त्वरित मार्ग काढावा. अन्यथा, माझ्या आयुष्यातील शेवटचे बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीत आहे, असे म्हणत अण्णांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

  • शेतकऱ्यांच्या भावनांना पाठिंबा- संजय राऊत

हा भारत बंद राजकीय नसून, तो शेतकऱ्यांच्या भावनांना पाठिंबा देणसाठी आहे. स्वयंस्फुर्तीने हा भारत बंद आहे, ज्याच्यामुळे आपण खातोय तो शेतकरी थंडीची पर्वा न करता दिल्लीत आंदोलन करतोय. माझ्या माहितीप्रमाणे कुठेही बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. आपल्या मनाने सर्व जण बंदमध्ये सहभागी होत असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

  • पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न - रामदास आठवले
    केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांना काही संघटना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा विरोध आहे, त्यांनी येणाऱ्या अधिवेशनात आपले मुद्दे मांडावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते कोल्हापुरात बोलत होते.

Last Updated : Dec 8, 2020, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details