मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर वाहतूक शाखेने नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात जोरदार कारवाई केली आहे. शहरातील मुख्य मार्ग शिवाजी चौक ते गोल्डन नेस्ट सर्कल रस्त्यावर एकाच दिवसात ९४५ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे.
वाहतूक शाखेची विशेष मोहीम-
मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहन चालक नियम पायदळी तुडवत आहेत. एकाच दिवशी मीरा भाईंदर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नियम तोडणाऱ्या ९४५ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. काशीमीरा शिवाजी चौक ते गोल्डन नेस्ट सर्कल अशी एक विशेष मोहीम राबविण्यात आली होती. रस्त्यावर उभ्या असलेल्या अवैध पार्किंगमधल्या २४१ वाहनांना जामर लावून कारवाई केली आहे. रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या ७ वाहनचालकांवर २७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मर्सिडीज कारवर ५७ केसेस,५३ हजार थकबाकी वसूल-
कारवाई करत असताना वाहतूक शाखेच्या अधिकारी एम जी पाटील शिवार गार्डन जवळ उभ्या असलेल्या अवैध पार्किंग मधल्या कारची विचारपूर केली. मर्सिडीज कारचा वाहन क्रमांक मशीनमध्ये टाकला असता धक्कादायक माहिती समोर आली. कारवर आतापर्यंत एकूण ५७ केसेस झाल्या आहेत. कार मालकाकडे ५३ हजार ६०० दंड बाकी आहे. वाहतूक विभागाचे अधिकारी एम जी पाटील यांनी तात्काळ दंड भरा अन्यथा वाहन जप्त करण्यात येईल, अशी तंबी कार मालकाला दिली. तडजोड न करता वाहन चालकाकडून ५३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.