मुंबई - मुंबईतील पवई परिसरातील मेट्रो प्रकल्प कामाच्या अंतर्गत लोखंडी सळया चोरणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला तेथील 4 सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली. यात अनिकेत बनसोडे या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उमेश परब (38), सजाता अली नौशाद अली (26), सचिन मांडवकर (38) व संदीप जाधव (30) या चार सुरक्षारक्षकांना खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात अटक केली आहे.
हेही वाचा -मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेचा लोकल प्रवास? फोन उचलायला ठेवला होता एक माणूस
पवई परिसरातील मिलिंद नगर येथे राहणाऱ्या अनिकेत बनसोडे हा मंगळवारी रात्री पवई परिसरात निर्माणाधिन असलेल्या मेट्रो साईटवर जावून तेथील लोखंडी सळ्या चोरत असल्याचे तेथील 4 सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. या चार सुरक्षा रक्षकांनी अनिकेतयास बांबू व लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर त्यास मिलिंद नगर येथील रस्त्यावर आणून सोडले. बेशुद्ध झालेल्या अनिकेतला स्थानिकांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.