मुंबई -बार्ज दुर्घटना प्रकरणी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. चौकशी भरकटवून न्यायापासून लटकवणारे राज्य शासनातील झारीतील शुक्राचार्य कोण? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
पी 305 हे बार्ज तौक्ते चक्रीवादळात दुर्घटनाग्रस्त झालं. या बार्जवर काम करणाऱ्या जवळपास साठ कामगारांचा मृत्यू झाला. तर 180 कामगारांना वाचवण्यात आलं. मात्र आता या दुर्घटनेनंतर या सर्व प्रकरणावर राजकारण सुरू झाले असून राज्य सरकारमधील पी 305 या बार्ज दुर्घटनेवर राज्य सरकारमधील मंत्री राजकारण करत असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
याप्रकरणात येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मुंबई पोलीस या प्रकरणाची योग्य चौकशी करत नसल्याचाही आरोप आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आला. या प्रकरणात राज्य सरकारमधील काही मंत्री आणि पोलीस हे या घटनेतील मुख्य आरोपी यांना पाठीशी घालत असून या प्रकरणात पी 305 चे कॅप्टन राकेश वल्लव यांच्यावर सगळे आरोप थोपवण्याचा डाव सुरू असल्याचं थेट आरोप केला आहे. तसेच शापूरजी पालमजी यांच्या मालकीची एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे पी 305 हे बार्ज दुर्घटनाग्रस्त झाले. या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण दुर्घटनेचा तपास भरकटवण्यासाठी कंपनी वर आरोप न करता बेपत्ता असलेले कॅप्टन राकेश वल्लव यांच्यावर आरोप करून कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आशिष शेलार यांच्याकडून सांगण्यात आले.
केंद्र सरकारचे चौकशीचे आदेश
पी 305 बार्जच दुर्घटनाग्रस्त होताच केंद्र सरकारकडून या दुर्घटनेसंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र असे असून देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही नेते राजकीय हेतूने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीला काहीही आधार नसल्याचं आशिष शेलार यांच्याकडून सांगण्यात आले.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र ही बाब वस्तुस्थितीला धरुन आहे असे वाटत नाही. या दुर्घटनेला केवळ कॅप्टनलाच कसे जबाबदार धरता येईल? सदर बार्जचे कंत्राटदार कंपनी या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे. मात्र कंपनी यातून पळ काढू पाहत असल्याने त्या कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे सांगत आशिष शेलार यांनी काही महत्त्वाच्या मुद्यांवर पोलिसांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा -कॉंग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला नेता आम्ही गमावला - बाळासाहेब थोरात
पी 305 बार्ज दुर्घटनेवर आशिष शेलार यांनी केले प्रश्न उपस्थित -
समुद्रात कोणत्याही प्रकारचे काम करणाऱ्या जहाजांना ओएनजीसीच्या नियमानुसार दरवर्षी 15 मे ला पाण्याबाहेर यावे लागते. त्यासाठी सदर काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला 12 मे ला कर्मचाऱ्यांना परतीच्या प्रवासाला घेऊन निघणे आवश्यक असते. मग एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेने 15 जून पर्यंत मुदतवाढीची मागणी का केली होती?