महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे पूर्ण क्षमतेने धावू लागली, मग दैनंदिन तिकीट का नाही; वडेट्टीवारांचा सवाल

अजूनही रेल्वे प्रवाशांना दैनंदिन तिकीट दिले जात नाही. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, रेल्वे पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे मग दैनंदिन तिकीट का नाही? असा प्रश्न त्यांच्याकडूनच रेल्वेला विचारण्यात आला आहे.

विजय वडेट्टीवार

By

Published : Oct 28, 2021, 5:13 PM IST

Updated : Oct 28, 2021, 10:18 PM IST

मुंबई -कोविडचे दोन्ही डोस घेऊन ज्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, ज्यांच्याकडे युनिवर्सल पास आहे. अशा प्रवाशांनाच लोकलचा मासिक, तीन आणि सहा महिन्यांचा पास देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र अजूनही रेल्वे प्रवाशांना दैनंदिन तिकीट दिले जात नाही. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, रेल्वे पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे मग दैनंदिन तिकीट का नाही? असा प्रश्न त्यांच्याकडूनच रेल्वेला विचारण्यात आला आहे.

सूचना नाहीत

दैनंदिन तिकीट देण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला कोणत्याही सूचना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ज्यांनी कोविडचे दोन्ही डोस घेतले आहेत, ज्यांच्याकडे युनिव्हर्सल पास आहे. तरीसुद्धा त्यांना महिन्याचा पासच काढावा लागत आहे. देशातच नाही तर राज्यात, मुंबईतही मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण झालेले असल्याने १५ ऑगस्टपासून ज्यांनी कोविडचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना लोकलचा मासिक पास देण्याचा निर्णय झाला व तशा पद्धतीचे पास द्यायला सुरुवात झालेली आहे.

प्रवाशांचे हाल

अनेक रेल्वे प्रवासी असे आहेत ज्यांना एखाद दुसर्‍या दिवशी कामानिमित्त इतरत्र जायचे असते. त्यांना मात्र दैनंदिन तिकीट अजूनही दिले जात नाही. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी हा निर्णय सर्वस्वी रेल्वे प्रशासनाचा असल्याचे म्हटले आहे. रेल्वे आता पूर्ण क्षमतेने पुन्हा रुळावर धावू लागली असल्याने त्यांनी आता तिकीट द्यायला काय हरकत आहे, असा प्रश्न त्यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाला याबाबत सरकारकडून कुठलेही पत्र आले नसल्याने आम्ही ते देऊ शकत नाही, असे उत्तर दिले जात आहे. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय या दोघांच्या वादामध्ये सामान्य रेल्वे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

मध्य-पश्चिम उपनगरीय रेल्वे सुरू

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या वाढल्याने लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आजपासून मध्य रेल्वेवर ७२ तर पश्चिम रेल्वेवर ६३ अशा १३५ लोकल फेऱ्या वाढल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, रद्द केलेल्या जलद लोकल, पंधरा डब्यांची लोकल, धीम्या लोकल आजपासून सुरू झाल्या आहेत. एकूणच मध्य रेल्वेवरून १ हजार ७७४ फेऱ्या आणि पश्चिम रेल्वे वरून १ हजार ३६७ सुरू झाल्या आहेत.

रेल्वे कर्मचारी व प्रवाशांत वाद

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना तिकीट नाकारले जात असल्याने मुंबईमध्ये दररोज तिकीट खिडकीवर रेल्वे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्यामध्ये भांडणे होताना दिसताहेत. कधीकधी हे वाद टोकालासुद्धा जात आहेत. आमचे दोन्ही डोस झालेले आहेत त्याला पण चौदा दिवसांचा कालावधी झाला आहे. आमच्याकडे युनिव्हर्सल पाससुद्धा आहे. तरीसुद्धा आम्हाला तिकीट का दिले जात नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत. एक दिवसाच्या प्रवासासाठी आम्ही महिन्याभराचा पास का काढावा, हा प्रमुख मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना अजूनही दैनंदिन तिकीटासाठी वाट पाहावी लागणार हे नक्की.

Last Updated : Oct 28, 2021, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details