मुंबई - शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजीतसिंह डिसले यांनी मिळाला. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला गेला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. दरम्यान, डिसले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्र पाठवून डिसले यांचे अभिनंदन केले.
जगातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आपली मानसिकता-
गायकवाड यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, या पुरस्कारासाठी जगभरातील 140 देशातून प्राप्त झालेल्या 12 हजार नामांकनांमधून आपली निवड झाली. ही बाब अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार मिळविणारे आपण पहिले भारतीय शिक्षक ठरले आहात. पुरस्काराबरोबर मिळालेल्या 7 कोटी रकमेतून अर्धी रक्कम आपण अंतिम फेरीतील विविध देशातील 9 शिक्षकांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून आपली शिक्षणविषयक तळमळ व विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता जगातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आपली मानसिकता दिसून येते. आपल्याकडील दुसऱ्याला देण्यामध्ये आनंद घेण्याची वृत्ती दिसून येते.
देशाची व महाराष्ट्राची मान निश्चितच उंचावली-
“अंतिम यादीतील सगळ्या शिक्षकांकडे एकसारखीच गुणवत्ता आहे. मी फक्त निमित्त आहे. दुसरे म्हणजे अंतिम यादीतील 9 शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करतील तेव्हा शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडेल.” हे आपले म्हणणे व कृती आपल्या देशाच्या महान परंपरेला साजेशी आहे. यामुळे देशाची व महाराष्ट्राची मान निश्चितच उंचावली आहे, असे गायकवाड म्हणाल्या.