मुंबई - तिवरे धरण फुटीच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याची मर्यादा असणार आहे.
तिवरे धरणाच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले प्रकल्पग्रस्तांना 453 चौरस फूट घर बांधून देण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. एका महिन्यात अहवाल आणि प्रकल्पबाधित पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना, धरण फुटीचे मुख्य कारण खेकडे आहे की माणूस, हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असे सामंत म्हणाले. अहवालात केलेल्या शिफारशीनुसार दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या धरण फुटीत 21 जणांचा बळी गेला होता. संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने दिलेल्या मदतीचा पाठपुरावा घेण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.