मुंबई -प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने ( Maharashtra NCC Won Pradhanmantri Dhwaj ) सात वर्षानंतर मोठ्या फरकाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री ध्वज’चे ( Pradhanmantri Dwaj Winner ) विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिक आणि अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे हे यश शक्य झाले, असे मत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सात वर्षांनी प्रधानमंत्री ध्वजाचा बहुमान -
मेजर जनरल वाय.पी. खटूरी, बिग्रेडीअर लाहीरी व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) पथकातील छात्रसैनिकांनी नेत्रदिपक यश प्राप्त केले. महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 17 वेळा प्रधानमंत्री ध्वजाचा बहुमान मिळाला आहे. गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांक मिळत होता. मागील वर्षी महाराष्ट्र हा प्रधानमंत्री ध्वजाचा उपविजेता ठरला होता. तर राज्याला तब्बल सात वर्षांनी हा प्रधानमंत्री ध्वजाचा बहुमान मिळाल्याने या बहुमानाचे विशेष महत्व आहे. भविष्यात पुन्हा अशीच कामगिरी करावी, यासाठी केदार यांनी शुभेच्छा दिल्या.