मुंबई - पोलीस बदली गैरव्यवहारबाबत गुप्त माहिती केंद्रीय तपास यंत्रणेला दिल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी (Devendra Fadnavis Interrogation) करण्यात आली. यात कोणताही राजकीय हेतू नव्हता, तर राज्याच्या हितासाठीच चौकशी केल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. विधानपरिषदेत नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था विषयक प्रस्तावावर उत्तर देताना देसाई बोलत होते.
- काय म्हणाले शंभूराज देसाई -
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक क्लीप दिली. त्यात १२५ तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असून, षड्यंत्र रचल्याचे काही पुरावे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. तसेच ती क्लीप अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर केंद्रीय गृह विभागाच्या मुख्य सचिवांना एक प्रत दिली होती. या सर्व प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास सुरू आहे. मात्र, गृह विभागाचे गोपनीय अहवाल दुसऱ्यांना पुरवणारे कोण? हे चौकशीअंती समोर येईल. तसेच माहिती घेण्यासाठी फडणवीस यांची चौकशी केल्याचे देसाई म्हणाले. तसेच गृह विभागाच्या काही बाबी गोपनीय असतात. त्या बाहेर जाता कामा नये याची दक्षता घेतलेली असते. तरीही गृह विभागातल्या या बाबी विरोधी पक्षनेत्यांपर्यंत पोहोचल्या कशा, त्यांना त्या कोणी पुरवल्या याबाबत चौकशी होणे भाग होते. म्हणून त्यांची चौकशी केल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
- या प्रकरणात एकूण २४ लोकांची माहिती घेतली -
विरोधी पक्षनेत्यांना यापूर्वी पाच पत्रे दिली होती. त्याची उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे आता नुकतेच सहावे पत्र दिले. या प्रकरणात केवळ देवेंद्र फडणवीस यांची चौकशी केली असे नाही. तर या प्रकरणात एकूण २४ लोकांची माहिती घेतली आहे. गोपनीय आणि संवेदनशील माहिती बाहेर जाऊ नये, ती माहिती बाहेर पुरवणारे कोण हेच यातून शोधून काढायचे आहे. त्यामुळे फडणवीस यांची चौकशी केली. यात कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.