महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'दलित अत्याचाराच्या प्रश्नांवर मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये'

दलित अत्याचारांविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

mumbai
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 5, 2020, 8:06 PM IST

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध एक शब्दही काढला नाही. दलित अत्याचाराविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहचलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

हेही वाचा -काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह : 'हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशयास्पद'

संजय राऊत यांनी रामदास आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहिती नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो, मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचाराविरुद्ध मी मूळ पँथर असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. पुढे आठवले म्हणाले की, हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला, आंदोलन केले. लखनऊला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडवले होते. त्यामुळे मी 2 ऑक्टोबरला हाथरसला जाऊ शकलो नाही. आता मात्र उद्याच हाथरसला जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कलावंतांची कदर करणारे नेते होते. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. एखाद्या अभिनेत्री महिलेवर अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार, अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले आहेत. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेला हरताळ फासण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. कंगना रणौत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही. ते आमच्यावर टीका करत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत. पायल घोषवर झालेल्या अन्यायाबाबत ती भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी महिला आहे. त्यातून आम्ही तिची बाजू घेतली. संजय राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर, दलितांवर अत्याचार होतात तिथे तिथे आम्ही त्या त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत. पण, संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नांवर व्यक्त झाले नाहीत आणि संसदेत खासदार म्हणूनही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला नसल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details