महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 1, 2020, 5:02 PM IST

ETV Bharat / city

राज्यात पुन्हा रक्तटंचाई? शिबिरे वाढवण्याच्या राजेंद्र शिंगणे यांच्या सूचना

राज्यात पुन्हा रक्तटंचाई निर्माण झाली आहे. याची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे. त्यानुसार त्यांनी रक्तसाठा वाढवण्यासाठी रक्तदान शिबिरे वाढवण्याच्या सूचना आज रक्तपेढ्या आणि सेवा भावी संस्थांना केल्या आहेत.

राजेंद्र शिंगणे
राजेंद्र शिंगणे

मुंबई -कोरोनाचा कहर राज्यात सुरू झाल्यानंतर त्याचा मोठा परिणाम रक्तसाठ्यावर झाला. एप्रिल-मेमध्ये रक्तटंचाई निर्माण झाल्याने रक्तदान शिबिरे वाढवण्यासह इतर माध्यमातूनही रक्तसाठा वाढवण्यात आला. पण आता मात्र राज्यात पुन्हा रक्तटंचाई निर्माण झाली आहे. याची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे. त्यानुसार त्यांनी रक्तसाठा वाढवण्यासाठी रक्तदान शिबिरे वाढवण्याच्या सूचना आज रक्तपेढ्या आणि सेवा भावी संस्थांना केल्या आहेत.

'या'मुळे रक्तटंचाई

राज्यात आजच्या घडीला 200हुन अधिक रक्तपेढ्या आहेत. या सर्व रक्तपेढ्यांमध्ये किमान 20 दिवस पुरेल इतका रक्तसाठा असतो. वैयक्तिकरित्या रक्तदान करणारे दाते आणि रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून हा रक्तसाठा जमा केला जातो. पण कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदात्यांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. तर रक्तदान शिबिरे ही खबरदारी म्हणून कमी करण्यात आली आहेत. त्याचवेळी रक्त दान शिबिरातही दाते म्हणावे तसे पुढे येताना दिसत नाहीत. परिणामी रक्तसाठा कमी झाला आहे. अनेक रक्तपेढ्यांमध्ये 5-7 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

एफडीएत पार पडली बैठक

राज्यात टंचाई निर्माण झाल्याच्या वृत्ताची अखेर शिंगणे यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार आज एफडीएच्या वांद्रे येथील मुख्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला एफडीए आणि राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या अधिकाऱ्यासह रक्तपेढ्याचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साठा वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश शिंगणे यांनी दिले आहेत. सर्व जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी, तहसीलदार, सिव्हिल सर्जन आणि राजकीय नेत्यांनी ही विविध माध्यमातून रक्तदान शिबिर वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना ही यावेळी देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details