मुंबई - मुंबईतील लोकलमध्ये आजपासून महिलांना प्रवास करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलच्या प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतूक आता महिलांसाठीही सुरू झाली आहे. रेल्वेमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली होती.
'मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान आणि सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. यासाठी रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत,' असे ट्विट गोयल यांनी मंगळवारी केले होते.
राज्य शासनाने रेल्वेला 17 ऑक्टोबरपासून सर्व महिला प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये चढण्यास परवानगी देण्यास सांगितले होते. मात्र, यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. या विषयावर गेल्या दोन दिवसांपासून अनेक बैठका सुरू होत्या. यानंतर काल रेल्वेमंत्री गोयल यांनी अखेर महिलांना लोकल ट्रेनमधील प्रवासासाठी हिरवा कंदिल दाखवला.
आतापर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच लोकलच्या प्रवासाची अनुमती होती. यामध्ये रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र, अधिक लोक एकत्र आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने इतरांना या प्रवासाची मुभा दिली नव्हती. आता देश अनलॉक होत असताना हळूहळू सर्व सेवा पूर्ववत होत आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांना रेल्वे प्रवास करू देण्याच्या मागणीने जोर धरला होता.
हेही वाचा :शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने