मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Uddhav Thackeray Nitin Raut Meet) आणि ऊर्जा विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आज पुन्हा एकदा राज्यातील वीज पुरवठाबाबत (Power Shortage in Maharashtra) चर्चा झाली. तसेच राज्यामध्ये सुरू असलेल्या भारनियमाबाबत देखील चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सायंकाळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut on Electricity Shortage Crisis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कमी वीजपुरवठा आणि वीज पुरवठा खंडीत केलेल्या कंपन्यांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या शासकीय निवासस्थानी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
येत्या आठ दिवसात जादा वीज मिळेल - सध्या राज्यात 27 हजार 273 मेगावॉट विजेची मागणी आहे. जे एस डब्ल्यू आणि अदानी पॉवर कंपनीने वीज पुरवठा कमी केला आहे. अदानी कंपनीकडून 3100 मेगावॅट विजेची मागणी आहे. मात्र त्यापेक्षा तेराशे ते चौदाशे मेगावॅट वीज कमी मिळत आहे. तिथेचे जे एस डब्ल्यू कंपनीचा प्लांट बंद पडल्याने शंभर मेगावॅट वीज मिळत नसल्याचे ऊर्जामंत्री यांनी माहिती दिली. त्यामुळे करार करूनही वीज देत नसल्याने संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे. तर टाटा पॉवरकडून 180 मेगावॉट वीज येत्या आठ दिवसात मिळणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.