महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाकाळात २१ हजार बेरोजगारांना रोजगार - नवाब मलिक

जूलै महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठावर ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून यासह आधी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे.

minister nawab malik on employment of youth in corona pandemic
minister nawab malik on employment of youth in corona pandemic

By

Published : Aug 25, 2020, 7:09 PM IST

मुंबई- कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल २१ हजार ५७२ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

त्यानंतर जूलै महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठावर ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. यासह आधी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करत आहे.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्य, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधत आहेत. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. तसेच फक्त जुलै महिन्यात ५८ हजार १५७ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैमध्ये मुंबई विभागात १२ हजार १५१, नाशिक विभागात ८ हजार ५२६, पुणे विभागात २२ हजार २६०, औरंगाबाद विभागात ६ हजार २७५, अमरावती विभागात ३ हजार ३६६ तर नागपूर विभागात ५ हजार ५७९ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. जुलैअखेर २१ हजार ५७२ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले आहे. मुंबई विभागातील ३ हजार ९४०, नाशिक विभागातील १ हजार ३२१, पुणे विभागातील १४ हजार ५२१, औरंगाबाद विभागातील १ हजार १०५, अमरावती विभागातील ४१४ तर नागपूर विभागातील २७१ उमेदवार नोकरीस लागले आहेत.

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते जून या ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले तर जुलै महिन्यात ३१ मेळावे झाले. जुलैमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये २०४ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १९ हजार ७८ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १८ हजार १५३ नोकरी इच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ६५१ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्यावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details