महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक नेते भाजपात - नवाब मलिक

निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असणारे नेते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असा चिमटा मंत्री नवाब मलिक यांनी काढला आहे.

Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : Aug 28, 2021, 4:45 PM IST

मुंबई -ज्या राजकीय नेत्यांच्या नावावर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे, असे नेते भाजपमध्ये आहेत, अशी बोचरी टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असणारे नेते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असा चिमटाही मलिक यांनी काढला आहे. राज्य सरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.

हेही वाचा -ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला वांझोटे म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे - विजय वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे ज्या पद्धतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते, त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता आणि त्याला मंत्री केले होते. त्या हस्तकावर टाडा लावला होता, अशांना मोदीजी मंत्री करत होते. आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे काही लोक आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले. तसेच भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत याची आठवणही नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना करुन दिली आहे.

  • एक कोटीचा लसीचा टप्पा पूर्ण, हा मोठेपणाचा विषय नाही -

देशात दरदिवशी एक कोटी लस उपलब्ध झाली पाहिजे. तसेच महाराष्ट्रात दरदिवशी २०-२५ लाख लोक लसीच्या दुसर्‍या डोससाठी प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे देशात एका दिवसात एक कोटीचा लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नाही, असा टोला नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. दरम्यान, केरळ व महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन राज्यात जास्तीत जास्त लससाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

हेही वाचा -राणेंच्या यात्रेत नियमांचे उल्लंघन; सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे

ABOUT THE AUTHOR

...view details