मुंबई - नवाब मलिक यांच्यावर सुडाचे राजकारण केले जात आहे. म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्न येत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal talk on nawab malik resignation ) यांनी सांगितले. नवाब मलिक याना ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवस्थानी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर, काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुनील केदार हे नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या बैठकीनंतर शरद पवार, छगन भुजबळ महा विकास आघाडीचे नेते यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाऊ नये, असे ठरल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.आजच्या प्रकरणानंतर देशभरातून विविध नेत्यांनी शरद पवार यांना फोन केल्याचे सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा शरद पवार यांना फोन केला. तर, छगन भुजबळ यांनी सांगितले की, हे प्रकरण जुने असून तीस वर्षांपूर्वी झालेल्या प्रकरणाचा आता नव्याने तपास सुरू करण्यात आला असून, सुडाच्या भावनेने नवाब मलिक यांना हटविण्याचा प्रयत्न केला आहे.
७ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक.. न्यायालयाकडून ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी..
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची ३ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी याबाबत आदेश दिला आहे.
'काँग्रेस पक्ष मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी; केंद्राने महाराष्ट्राची बदनामी थांबवावी'
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED Arrested Nawab Malik ) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on Nawab Malik Arrest ) यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया
बई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपींकडून जमिनीचे व्यवहार केल्याप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले ( ED Take Custody Nawab Malik ) आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये नवाब मलिक दोषी असून, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही मलिकांच्या राजीनाम्याची मागणी ( Sharad Pawar Should Resign Malik ) सोमैयांनी केली आहे.
'2024 नंतर ते आहे अन् आम्ही, भाजपा नेत्यांचीही प्रकरणं ईडीकडे देणार -राऊत
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सकाळी ६ वाजता ईडीचे चार अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहेत. काही दिवसापूर्वीच ईडीने नवाब मालिकांना समन्स बजावला असल्याची माहिती आहे. हे समन्स कोणत्या प्रकरणात बजावण्यात आले होते, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. नवाब मलिकांच्या चौकशी प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"नवाब मलिक हे सत्याच्या बाजूने आहेत, ते नेहमीच सत्य बोलत आले आहेत, ते भाजप विरोधात आवाज उठवत आहेत म्हणूनच मलिकांवर ईडीने कारवाई केली आहे. मात्र, कितीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही. ही लढाई अशीच सुरू राहील. परंतु तपास यंत्रणांनी 2024 नंतर येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे." असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
जे जे रुग्णालयात मलिकांची तपासणी -
कुर्ल्यातील एका जमीन खरेदी-विक्री प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना् ईडीने अटक केली आहे. मलिक यांची ईडीकडून आज तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी 2 वाजून 55 वाजता मलिकांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयात मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडी नवाब मलिक यांची कस्टडी देखील मागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत ईडीने टाकले होते छापे -
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच, ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते.
काय आहे नेमकं प्रकरण?
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक इक्बाल मिर्ची याच्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने विकास केला होता. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून मिर्ची फॅमिलीला तिसर्या मजल्यावर 9 हजार चौरस फूट आणि चौथ्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट असे एकूण 14 हजार चौरस फुटांचे बांधकाम दिले होते. ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. तर, याप्रकरणात ईडीने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे.
ईडीने आतापर्यंत वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील मालमत्तेसह साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, ताडदेवमधील अरुण चेंबर्समध्ये असलेले कार्यालय, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यावसायिक दुकाने, बंगले आणि लोणावळ्यातील 5 एकर पेक्षा अधिक जमीन अशा ईक्बाल मिर्चीच्या तब्बल 600 कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.