मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांची आज ( बुधवारी ) सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. ईडीकडून होणाऱ्या या चौकशीवर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. शिवाय भाजपाचे नेतेही या चौकशीवर भाष्य करत आहे. सध्या या प्रकारामुळे आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
- सकाळी ईडी अधिकारी मलिकांच्या घरी दाखल
आज (बुधवारी) पहाटे 5 वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले. तिथे काही वेळ नवाब मलिक यांनी अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना 7.45 दरम्यान ईडी अधिकारी आपल्या कार्यालयात घेऊन आले. अद्यापही त्यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
- नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया...
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ईडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नवाब मलिक ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधात भूमिक मांडत होते, त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यवाहीची आम्हाला खात्री होती. परंतु, ईडीने आता कोणती केस काढली याबाबत माहिती नाही, असेही पवार म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे...
नवाब मलिक एक मंत्री आहेत. त्यांना कोणतीही नोटीस न देता अशी कारवाई करणे चूकीचे आहे. ईडीचा धाक दाखवून अशा प्रकारचे राजकारण सुरु असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
काय म्हणाले राऊत?
नवाब मलिक हे सत्याच्या बाजूने आहेत, ते नेहमीच सत्य बोलत आले आहेत, ते भाजपा विरोधात आवाज उठवत आहेत म्हणूनच मलिकांवर ईडीने कारवाई केली आहे. मात्र, कितीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. ही लढाई अशीच सुरू राहील. परंतु तपास यंत्रणांनी 2024 नंतर येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
मंत्री जयंत पाटील...
हा आणखी एका सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे, ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
यशोमती ठाकूर...
जे सरकार केंद्रात सत्तेवर आहेत, मात्र त्यांना राज्यात सरकार बनविता आले नाही. त्यामुळे त्यांना घाई झाली आहे. त्यामुळेच ईडीच्या कारवाया होत आहेत. पण आम्ही एकत्र आहोत. मी पुन्हा येईन.. असे कोण म्हणाले होते. ईडीच्या मागून कुणाला सरकारमध्ये येण्याची घाई झालेली आहे. हे जनेतला माहिती आहे, असा टोला महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने
मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयासमोर जमा झाले. तुम आगे बढो हम तुम्हारे साथे है, अशा घोषणांनी ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे एकत्र झाले आहेत. दरम्यान, ईडी विरोधात, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात कार्यकर्ते मोठ्यामोठ्याने घोषणा देत आहेत. तसेच, मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने जमल्या आहेत.
- भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया...
आमदार राम कदम म्हणाले...
आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याच्या साथीदाराची जमीन कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. देशद्रोहाच्या साथीदाराकडून जमीन विकत घ्यायची आणि चौकशी केली तर कांगावा करायचा हे योग्य नाही. महाराष्ट्रातील जनता हे सर्व जाणून आहे. ईडीची कारवाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर त्या व्यक्तीने जर एखादी वाईट कृत्य केले असेल भ्रष्टाचार केला असेल तर त्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार राम कदम यांनी दिली आहे.
किरीट सोमैया म्हणाले...
मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपींकडून जमिनीचे व्यवहार केल्याप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये नवाब मलिक दोषी असून जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी राज्यपालांकडे तर केलीच आहे. परंतु त्यासंदर्भात त्यांनी शरद पवारांना ही विनंती केली आहे की त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा.
1993 च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात गुन्हेगार असणारे सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडून नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील जमीन खरेदी केली होती. कुर्ल्यात मोक्याच्या परिसरामध्ये ही तीन एकर जागा असल्याचे फडणीसांनी सांगितले होते. 2005 मध्ये या ठिकाणी दोन हजार रुपये स्क्वेअर फुटच्यावर भाव असताना केवळ पंचवीस रुपये स्केअर फुट किमतीवर ही जमीन खरेदी कशी केली ? असा प्रश्न पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. मात्र या जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसून देवेंद्र फडणवीस सांगत असलेल्या तीन एकर जागा आपण खरेदी केली नाही. त्या जागेवरील काही भाग कायदेशीर रित्या खरेदी केला असल्याचे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आला होता.
हेही वाचा -Sharad Pawar on Nawab Malik : 'सरकार विरोधात जाहीर भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय'