मुंबई - फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. रियाज भाटी, इमरान शेख, मुन्ना यादव आणि हैदर आजम या गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी देवेंद्र फडणवीस यांचा संबंध आहे, शासकीय पदांवर देखील यापैकी काही लोकांना फडणवीस यांनी बसवले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते. या संबंधित लोकांवर नेमके कोणते आरोप आहेत? पाहूया या विशेष बातमीतून.
हेही वाचा -MSRTC strike : एसटीची सर्वात मोठी कारवाई; 3 दिवसांत 2 हजार 53 कर्मचारी निलंबित
नकली नोटाचे प्रकरण फडणवीसांनी दाबले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय झाल्यानंतर काही राज्यांमध्ये नकली नोटा पकडण्यात आल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रात जवळपास एक वर्ष नकली नोटा संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसी परिसरामध्ये डीआयआरने धाड टाकून 14 कोटी 56 लाखाच्या नकली नोटा पकडल्या होत्या. योगायोगाने त्यावेळी डीआयआरचे अधिकारी समीर वानखेडे हेच होते. याच वेळी मुख्यमंत्री असताना खोट्या नोटांचे हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी दाबले. तसेच, 14 कोटी 56 लाखांच्या पकडण्यात आलेल्या खोट्या नोटा या केवळ 8 लाख 80 हजार तेवढ्याच दाखवण्यात आल्या, असा आरोपही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तसेच, या प्रकरणांमध्ये आता भाजपमध्ये असलेले हाजी अराफत शेख यांचा भाऊ इमरान अलीम शेख याला ताब्यात घेतले होते. मात्र, हे सर्व प्रकरण दाबून टाकण्यात आले. तसेच, या खोटा नोटा नेमक्या कुठून आल्या होत्या? पाकिस्तानशी या नोटांचा संबंध होता का? याबाबत कोणतीही चौकशी त्यावेळी झाली नाही. मात्र, हे प्रकरण दाबल्यानंतर हाजी अराफत शेख यांना अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बनवले, असे नवाब मलिक म्हणाले आहे.
रियाझ भाटी अनेक कार्यक्रमांमध्ये नेत्यांसोबत दिसतो
आताही रियाझ भाटी फरार आहे. मात्र, रियाझ भाटी भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यावेळी दिसला होता. त्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत फोटो आहे. एवढेच काय तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना त्यांच्यासोबतही त्याचा फोटो आहे. मात्र, माझा कोणत्याही नेत्यांसोबत असलेला फोटवर आक्षेप नसून गुंड तसेच अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या प्रवृत्तीचा व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये कसा पोहोचतो? तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो कसा काढतो? पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीची स्कॅनिंग केल्याशिवाय त्यांना आत जाऊ दिले जात नाही, अशा परिस्थितीत गुंड प्रवृत्तीची व्यक्ती पंतप्रधानांपर्यंत पोहोचते कशी? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टता आणली पाहिजे, असे म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणीस यांचे मुन्ना यादवसोबत संबंध
मुन्ना यादव हे नागपूरचे रहिवासी असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तसेच, देवेंद्र फडणीस यांचे अतिशय निकटवरती आणि विश्वासू लोकांमधील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. मुन्ना यादव यांच्यावर नागपूरमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मुन्ना यादव अनेकदा तुरुंगात गेले आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला कन्स्ट्रक्शन वर्क्स बोर्डाचा अध्यक्ष बनवला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
बांगलादेशींना मुंबईत आणण्याचा हैदर आझमवर आरोप
हैदर आझम हा व्यक्ती बांगलादेशी लोकांना मुंबईत आणण्याचा काम करतो. याबाबत मलाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. मात्र, या गुन्ह्याबाबत कारवाई करू नये म्हणून मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून पोलीस स्टेशनला फोन करण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तसेच, गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला फडणवीस यांनी मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बनवले असल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा -Aryan Khan Drug Case : प्रभाकर साईलची एनसीबीकडून तीन तास चौकशी