मुंबई -अभिनेता किरण माने यांना तडकाफडकी मालिकेतून काढणे योग्य नसून, किरण माने आणि प्रोडक्शन हाऊस यांच्यामध्ये समेट घालण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्यानंतर आज (गुरुवारी) राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकरणाबाबत अभिनेते किरण माने, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि स्टार प्रवाह दूरचित्रवाणीकडून आलेले लेखक-दिग्दर्शक आणि स्टार प्रवाह मालिकेचे कन्टेन्ट हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा केली.
'मुलगी झाली हो' ही अत्यंत चांगली मालिका असून, यामध्ये तडकाफडकी किरण माने यांना काढण्यात आल्याची घटना ही दुर्देवी आहे. पुन्हा एकदा किरण माने यांना या मालिकेमध्ये सामील करून ही मालिका प्रेक्षकांसमोर जावी. यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. अभिनेता किरण माने यांच्याबाबत सहकलाकारांनी तक्रारी केल्यानंतर त्यांना समज देण्यात आली होती का? त्या तक्रारीचे प्रोडक्शन हाऊसकडे पुरावे आहेत का? हे प्रश्न या चर्चेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी सतीश राजवाडे यांच्या समोर उपस्थित केले. तसेच आपण कोणत्याही विचारांचा विरोध करत नसून, केवळ एखाद्या कलाकाराला तडकाफडकी मालिकेतुन काढण्याचा विरोध करत आहोत, असेही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच आज सतीश राजवाडे यांच्यासोबत पूर्ण प्रकरणावर चर्चा झाली असून, लवकरच पुन्हा एकदा यासंदर्भात चर्चा करून हे प्रकरण मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
मालिकेतील इतर महिला सहकलाकार किरण माने यांच्या बाजूने