मुंबई -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक करण्यात आल्याचे ट्वीट भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
“अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.”, असे ट्वीट किरीट सोमैया यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोधा केला होता. मात्र देशवासीयांनी भरभरून पंतप्रधानांच्या आवाहानाला पाठिंबा दिला होता. त्यांनतर कासार वडवली येथील अनंत करमुसे या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली होती. त्यानंतर या तरुणाने आव्हाडांचे एक अश्लील चित्र ही सोशल माध्यमावर पोस्ट केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्या वेळी निवासस्थानी आव्हाड उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करसुमे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
अंनत करमुसेंविरोधातही गुन्हा दाखल -
याचबरोबर अनंत करमुसेंविरोधातही जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आयटी ॲक्टनुसार आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा -चित्रा वाघ यांनी ब्लॅकमेलिंग करणे थांबवावे - आमदार विद्या चव्हाण