मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा जपला आहे आणि शेवटपर्यंत तो जपला जाणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यावर एकामागून एक संकट येत आहेत. काल परवा कोकणात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे झोकून काम करावे. लोकांच्या मदतीला धावून जावे, आपण कोकणाला पुन्हा उभे करू, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
२०१९ निवडणूक ही अभूतपूर्व होती. अनेकांना पवार साहेबांनी सर्व काही दिले मात्र ते पक्ष सोडून गेले. पक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र, आपला पक्ष पुन्हा उठून उभा राहिला. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पराभव केला आहे, याची आठवण जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. आपल्याला सर्वच घटकांसाठी काम करायचे आहे, म्हणून आपण सामाजिक न्याय हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतले. त्यामाध्यमातून आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. तशाप्रकारे कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार निवडून आला आहे. येत्या काळात आपल्याला मुंबईत पक्ष मजबूत करायचा आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, ठाणे इतर शहरातही निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी त्यासाठी आतापासूनच तयार रहावे. ग्रामपंचायत निवडणुकाही येणार आहेत त्यासाठीही सज्ज व्हावे. आज वर्धापनदिनीही पवारसाहेब कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणाने कधी पवारसाहेबांची साथ सोडली नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा आपल्या त्या कार्यकर्त्यांशी जोडलं जायचे आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.