मुंबई - तेलंगणाच्या मेडीगड्डा धरणातील पाणी राज्यातील काही गावात शिरून त्यामुळे जर जमीन आणि शेतीचे नुकसान झाले असेल, तर त्याची गंभीर दखल घेऊ आणि त्यासाठी तातडीने तेलंगणा सरकारला कळवण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. मागील काही महिन्यात तेलंगणा राज्यातील मेडीगड्डा धरणाच्या पाण्यामुळे पाणलोट क्षेत्रात नसलेल्या काही गावांचे नुकसान होत आहे. त्यामुळेच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, मेडीगड्डा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील ८ ते ९ गावे येतात. तेलंगणा राज्याने त्यासाठी तिथल्या जमिनीचे संपादन केलेले आहे. मात्र, तरीही शहरात पाणी जाण्याचा प्रकार होत असल्याने याविरोधात आमचे आमदार व नेते बाबा आत्राम हे आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, परंतु तेलंगणा राज्याने संपादित केलेली जमीन आहे. त्यापेक्षा व्यतिरिक्त जास्त जमिनींचे नुकसान झाले असेल, पाणी आले असेल त्याविषयी तेलंगणा राज्याला कळवण्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात आली आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.