मुंबई - मुख्यत्यारपत्र घेतलेले सलीम पटेल याच्याशी २००५ मध्ये जमीनीचा व्यवहार नवाब मलिक यांनी केला असताना त्यांचा दाऊदशी संबंध पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात तथ्य नसून ओढूनताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात येत असल्याचे मतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. ते मुंबईत जीतेंद्र आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधत होते.
जयंत पाटील म्हणाले, ज्या जमिनीचा संबंध जोडला जात आहे, त्या जमीनीचा व्यवहार करताना रितसर स्टॅम्पड्युटी भरली गेली. २००५ मध्ये व्यवहार झाला आणि २००७ मध्ये सलीम पटेल बॉम्बस्फोटात आरोपी होता. मग त्या व्यवहाराशी कसा संबंध जोडता असा सवालही जयंत पाटील यांनी केला. त्या जमीनीच्या हरकतीबाबत २०१८ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यावेळी मुनिरा प्लंबर यांनी कोणतीही हरकत घेतली नाही. मात्र २० वर्षानंतर जमीन खरेदीतील पैसे मिळाले नाही म्हणणे कितपत योग्य आहे, असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी सलीम पटेल यांना मुखत्यारपत्रानुसार पैसे दिल्यावर सलीम पटेल याने मुनिरा प्लंबर यांना पैसे दिले नाही. यामध्ये नवाब मलिक यांचा काय दोष याला जबाबदार सलीम पटेल आहे. त्याच्यावर कारवाई करायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले. मुनिरा प्लंबर यांनी आरोप केल्यानंतर ओढून ताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करुन अडकवण्यात आले आहे. हा सगळा प्रकार ओढून ताणून केला आहे. हे धक्कादायक आहे. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध नाही. नवाब मलिक हे अनेक वर्ष पक्षात काम करत आहेत. त्यांचा संबंध जोडणे ही निषेधार्ह बाब आहे. राज्यातील जनताही या घटनेचा निषेध करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
समन्स नसताना अटक करणे योग्य नाही. नवाब मलिक घाबरणारे नेते नाहीत. ईडीला जर माहिती हवी होती तर त्यांनी दिली असती परंतु तसे न करता एका मंत्र्यांला अशा पध्दतीने घरातून उचलून आणणे योग्य नाही. नवाब मलिक यांची बाजू देशासमोर, राज्यासमोर यावी म्हणून यासंदर्भातील माहिती देत असून अधिक मुद्दे वकील मांडतीलच असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.