मुंबई - विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत डझनभर आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का असून शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आमदार संपर्काच्या बाहेर असल्याने बोलावली बैठक -गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झाले आहेत. काल सायंकाळपासूनच ते गायब आहेत. आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी झाले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.