मुंबई -सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर राज्यात असलेल्या इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘महाज्योती’ महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ही स्थापन केली जाणार असल्याची घोषणा आज कामगार, इमाव, साशैमाप्र, विजाभज आणि विमाप्र मंत्री डॉ. संजय कुटे यांनी केली.
सारथी संस्थेबाबत माहिती सांगताना मंत्री डॉ. संजय कुटे 'महाज्योती' या संस्थेचे मुख्य कार्यालय हे पुण्यातच असणार आहे. तसेच बुलडाणा आणि नागपूर याठिकाणी याची २ विभागीय कार्यालये असणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून राज्यात ज्योतीदूत, जलदूत आणि सावित्रीदूत, असे ३ महत्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही कुटे यांनी दिली. यासोबतच त्यांनी धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवून अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण 13 योजना सुरु करणार असल्याचेही सांगितले.
पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात डॉ. कुटे यांनी सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर आपण एक नवीन ही एका महिन्याच्या आतच संस्था स्थापन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी या संस्थेची घोषणा केली. 'महाज्योती' ही संस्था सारथी व बार्टीप्रमाणे विविध स्पर्धा परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करणार आहे. महाराष्ट्रातील मागासवर्गीयांच्या विकासामध्ये फुले, शाहू, आंबेडकर या ३ महामानवांचा अमूल्य वाटा आहे. शाहू महाराजांच्या नावाने सारथी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी या संस्था कार्यरत आहेत.
महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून विविध योजनावर सन २०१९-२० मध्ये १३२४.६८ लाख तर १९२०-२१ साली एकूण ३७९११.३४ लक्ष इतका खर्च करण्यात येणार आहे. महाज्योती संस्थेत कोचिंग व मार्गदर्शन विभाग, मदत व समुपदेशन विभाग, ज्ञान कोष विभाग, मूल्यमापन विभाग, शेती, वनशेती, अर्वषण, प्रर्वण क्षेत्रातील शेती, संशोधन विभाग, सैन्यसेवा भरतीपूर्व प्रशिक्षण विभाग, न्यायसेवा स्पर्धा परिक्षा कोचिंग विभाग, महिला सक्षमीकरण विभाग, नाविण्यपूर्ण प्रकल्प विभाग, असे प्रमुख विभाग असतील, अशी माहितीही त्यांनी दिली.