मुंबई -गायक तरुणीनं बलात्काराचे आरोप केल्याने संकटात सापडलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मुंडे यांनी शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचे समजते.
शरद पवार यांच्या भेटीत धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्वत:ची बाजू मांडली असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे वजनदार नेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुंडे यांना या प्रकरणात काय सल्ला देतात, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
धनंजय मुंडे यांची बलात्कार प्रकरणात संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार हे खरंच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.