महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपने जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा पराभव मान्य करावा - बाळासाहेब थोरात - balasaheb thorat on bjp

राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यात राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

balasaheb thorat
balasaheb thorat

By

Published : Jan 18, 2021, 7:49 PM IST

मुंबई -राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यात राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीने ८० टक्के जागा मिळवून मोठा विजय मिळवला आहे. या निकालातून महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामावर जनतेने विश्वास दाखवला आहे. राज्यात भाजपचा दारूण पराभव झाला असून भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

हेही वाचा -तृतीयपंथी अंजलीची 'रिक्षा' सुसाट; ग्रामपंचायतवर झेंडा फडकवणारी पहिली तृतीयपंथी

महाविकास आघाडी सरकारवर जनतेचा विश्वास

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारवर जनतेचा मोठा विश्वास असून आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांत आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष म्हणून समोर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारूण पराभव करत महाविकास आघाडीला कौल देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखवलेला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे यश मिळाले असून ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला, येथेही काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -दादा, तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही; मुश्रीफांचा टोला

भाजपने पराभव मान्य करावा -

आजच्या निकालातून राज्यभर भाजपची झालेली पिछेहाट हे भाजपच्या धोरणांचे अपयश आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाच पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून व मतदारांचे आभार व्यक्त करत महाविकास आघाडीची ही विजयी घोडदौड या पुढेही अशीच कायम राहील, असे थोरात म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details