महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मराठा समाजाच्या प्रलंबित सवलती लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक' - mumbai latest news

मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या पण, अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मराठा आरक्षणसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण
मंत्री अशोक चव्हाण

By

Published : Jul 9, 2020, 4:07 AM IST

Updated : Jul 9, 2020, 9:16 AM IST

मुंबई -मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या पण, अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मराठा आरक्षणसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

बोलताना मंत्री अशोक चव्हाण

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बुधवारी (दि. 8 जुलै) सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर समितीचे सदस्य तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, बहुजन कल्याणमंत्री विजय वड्डेटीवार, विधि विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे यांच्यासह न्यायालयात राज्य शासनाची बाजू मांडणारे विधिज्ञ उपस्थित होते.

या बैठकीत येत्या बुधवारी 15 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात भक्कमपणे बाजू मांडण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच येत्या दोन-तीन दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये मराठा समाजाशी संबंधित विविध योजना व सवलती, त्यांची अंमलबजावणी तसेच न्यायालयीन कामकाजाच्या तयारीबाबत विचारविनिमय केला जाणार आहे.

चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षण व वैद्यकीय प्रवेशासंदर्भात बुधवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडून वैद्यकीय प्रवेशाला अंतरिम स्थगिती मिळू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भातील मूळ याचिकेवरील सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगऐवजी प्रत्यक्ष व्हावी, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

तसेच ‘सारथी’ आणि इतर अनेक विषयांसंदर्भात गुरुवारी (दि. 9 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठक घेणार आहेत. मराठा समाजासाठी मागील शासनाच्या काळात घोषित पण, अद्याप अंमलबजावणी न झालेल्या उपाययोजनाबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्याबाबतही या बैठकीत चर्चा होईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात समाजातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी (दि.10 जुलै) उपसमितीची बैठक होणार आहे. आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासंदर्भात या प्रतिनिधींच्या सूचना उपसमिती जाणून घेणार आहे. त्याच प्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीपूर्वी राज्य शासनाची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञांबरोबरही येत्या शनिवारी उपसमितीची बैठक होणार असून यावेळी प्रामुख्याने बुधवारी होणाऱ्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -दूध उत्पादकांना दिलासा; अतिरिक्त दुधाचे भुकटीत रुपांतर करणाऱ्या योजनेस मुदतवाढ, कॅबिनेटचा निर्णय

Last Updated : Jul 9, 2020, 9:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details