मुंबई -केंद्र शासनाने नोव्हेंबर, २०२१ मध्ये पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय कराच्या दरात कपात केली आहे. केंद्र सरकारच्या या कपातीनंतर आजपर्यंत देशातील २५ राज्यांमध्ये डिझेलच्या दरात तर २४ राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारला ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याविषयी अनेक निवेदने प्राप्त झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on Fuel Rate Deduction ) यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या छापील उत्तरात दिली आहे. आमदार प्रवीण दरेकर, विजय गिरकर, डॉ. रणजीत पाटील, सुरेश धस आदी आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
केंद्राची करकपात फसवी - पवार -केंद्र सरकारने मे, २०२० मध्ये पेट्रोल, डिझेलवरील सेस तसेच अतिरिक्त अबकारी करामध्ये वाढ केली होती. पेट्रोलच्या दरात १० तर डिझेलच्या दरात १३ रुपयांनी वाढ केली होती. ही वाढ नोव्हेंबर, २०२१ मध्ये पेट्रोलच्या दरात ५ रुपयांनी तर डिझेलच्या दरात १० रुपयांनी कपात केली आहे.
राज्याने यांनी केली एकदाच वाढ -कोरोना काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वापरात झालेल्या घटीमुळे राज्य शासनाच्या महसुलात झालेली तूट भरून काढण्यासाठी एक जून, २०२० मध्ये मुल्यवर्धित कराच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे.