मुंबई -भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीच्या सरकारबाबत चर्चा 2017 मध्येच पूर्ण झाली होती. मंत्रिपदाच्या वाटाघाटीबाबतही त्यावेळी चर्चा झाली असल्याचे वक्तव्य प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केले. मात्र, अशी बोलणी 2017 मध्ये होत होती. तर, आशिष शेलार यांनी त्या वेळीच का सांगितलं नाही.?, पाच वर्षे अशिष शेलार कोणाची वाट बघत होते, असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री नेते अजित पवार ( Minister Ajit Pawar ) यांनी आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांना लगावला. आहे. महाराष्ट्र समोर आता अनेक प्रश्न आहेत. मूलभूत प्रश्नांवर चर्चा सोडून इतर मुद्द्यावर चर्चा करण्यात सामान्य नागरिकांना कोणताही रस नाही. त्यामुळे 2017 किंवा 2015 यावर्षी काय झाले, यात कुणालाही रस नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधत होते.
राज ठाकरे यांचा आत्ताचा अजेंडा वेगळा -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आपल्या भाषणातून भोंगे तसेच हनुमान चालीसा सारखे यामुद्द्यांवर ते बोलत आहेत. हे मुद्दे बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फुस राज ठाकरे यांना असल्याचा आरोप केला जात आहे. यावर अजित पवार म्हणाले, जर राष्ट्रवादी काँग्रेसची राज ठाकरे यांना फूस असती तर, शरद पवार हे जातीयवादी नेते आहेत, असे राज ठाकरे म्हणाले असते का ?, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. आपल्या प्रत्येक भाषणातून सध्या राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हेच राज ठाकरे पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्यावर टीका करत होते. त्यामुळे 2019 ला राज ठाकरे यांचा वेगळा अजेंडा होता आणि आता त्यांचा वेगळा अजेंडा आहे, असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.