मुंबई - लसींचे दोन डोस घेतलेल्यांसाठी येत्या दोन दिवसांत लोकल प्रवासाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज दिली. मीठी नदी सुशोभकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा -लोकल प्रवासाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील - आरोग्यमंत्री
'राजकारण नको, लोकांचा जीव महत्त्वाचा'
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. लसींचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, ही मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात नियमांत शिथिलता आणली आहे. उर्वरित ११ जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले आहेत. इतर देशात लसीकरणानंतरही रुग्णसंख्या वाढत आहे. लोकल सेवेबाबत दोन-तीन आठवडे चर्चा सुरू आहे. पुढच्या एक-दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. तसेच दोन्ही डोस झालेल्यांना नुसते लोकलच नाही तर इतर गोष्टीत सूट देऊ शकतो का, याबाबत काळजीपूर्वक चर्चा सुरू असल्याचे उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. लोकलबाबत राजकारण करु नका. लोकांचे जीव वाचवणे गरजेचे आहे. शासन लवकरच सर्व सामान्य लोकांना दिलासा देईल, असेही ठाकरे म्हणाले.