महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BDD Chawl Worli Redevelopment : ना.म. जोशी मार्गावरील बीडीडीवरही आठ तारखेला पडणार हातोडा, मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश - बीडीडी चाळ पुनर्विकास

राज्य सरकारच्या अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीवर आठ तारखेला हातोडा पडणार असल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी दिलेल्या निर्देशांकामुळे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीने ( BDD Chawl Worli Redevelopment )आणि रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आनंद रहिवाशांनी व्यक्त केला.

बैठक
बैठक

By

Published : Feb 2, 2022, 3:24 PM IST

Updated : Feb 3, 2022, 5:08 PM IST

मुंबई -ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ ( BDD Chawl Worli Redevelopment ) होऊन तीन वर्षे उलटली तरीही प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नव्हती. याबाबत रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अखेर राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री तसेच वरळी विधानसभेचे आमदार तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी आज (दि. 2 फेब्रुवारी) म्हाडा कार्यालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले. येत्या आठ फेब्रुवारीला इमारतीच्या पाड कामास सुरुवात झालीच पाहिजे, असे निर्देश मंत्री ठाकरे यांनी दिले.

विरोधकांची बैठकीकडे पाठ -ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प ( BDD Chawl Worli Redevelopment ) काही मूठभर विरोधकांमुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडला असल्याची तक्रार रहिवाशांनी मंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबत गंभीर दखल घेऊन प्रकल्पाचे समर्थक आणि विरोधक या दोघांची ही बैठक म्हाडाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आज आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला विरोध करणाऱ्यांपैकी कोणीही उपस्थित राहिले नाही. त्यामुळे आता त्यांना शेवटची संधी देऊन झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना दिले.

संक्रमण शिबिरात स्थलांतरित होणाऱ्या भाडेकरूंना नोटीस -म्हाडा आणि प्रशासनाने वारंवार विनंती करूनही अनेक भाडेकरू त्यांना वितरित करण्यात आलेल्या संक्रमण शिबिराचा ताबा घेण्यास तयार नाहीत. अशा भाडेकरूवर आता कारवाई करण्यात येणार असून त्यांना नोटीस बजावण्यात ( Notice to Tenants ) येत आहे. त्यांनी जर आपल्या घराचा ताबा घेतला नाही, तर ही घरे इच्छुक असणाऱ्या अन्य भाडेकरूंना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

तर 95 अ ची अशी कारवाई सुरू -ना. म. जोशी मार्गावरील अनेक भाडेकरू हे घरांचा ताबा देण्यास इच्छुक नाहीत. वारंवार नोटीस देऊनही घरांचा ताबा सुपूर्द न करणाऱ्या रहिवाशांवर आता कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार या भाडेकरूंना घरे खाली करण्यासाठी 95 ची कारवाई सुरू करण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तात घरे खाली करण्यात येतील ( Police Protection ), अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत दिली.

रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण -मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशांकामुळे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीने ( BDD Chawl Worli Redevelopment )आणि रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आनंद रहिवाशांनी व्यक्त केला. दरम्यान, या बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष यांच्यासह आमदार सुनील शिंदे ( MLA Sunil Shinde ) आणि समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा -Mumbai Businessman Extortion Case : अपहरणकरुन व्यावसायिकाकडून मागितली ५० लाखांची खंडणी; पुढे झाले असे काही... वाचा ....

Last Updated : Feb 3, 2022, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details