मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर रविवारी शिंदे गटाची (Shinde group) बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारची आत्तापर्यंतची कामगिरी आणि निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत मंत्री अब्दुल सत्तार (minister abdul sattar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या समोरच त्यांच्या स्वीय सचिवाला (eknath shinde PA) शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. बाचाबाची नंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी व स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील सत्तार यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, परंतु सत्तार कोणाचेही ऐकण्याच्या मन स्थितीत नसल्याचे समजते. मंत्री सत्तार परखड मत मांडणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून सत्तार सतत काही ना काही वाद ओढावून घेताना दिसत आहेत.
मंत्रीपदासाठी लावली होती दिल्लीतून फील्डींग: उद्धव ठाकरें विरोधात बंड करण्यात सत्तार आघाडीवर होते. सत्तापलट झाल्यानंतर शिंदे यांच्या सरकारमध्ये देखील ते मंत्रीपदासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने शक्तीप्रदर्शन केले. भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे मंत्रीपद मिळणार नाही अशी कुणकुण लागताच त्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. तसेच दिल्ली गाठून केंद्रीय स्तरावर देखील सल्लामसलत केली. सत्तारांनी राजीनामा दिल्यास शिंदे गटातील नाराजी उफाळून येईल व सरकार वर गंडातर येईल, या धास्तीने शिंदेंनी अब्दुल सत्तारांना मंत्रीपद दिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.