मुंबई -मुंबईतील जवळजवळ १ लाख ५० हजार गिरणी कामगार ( Mill workers ) आजही घरांच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने वचन देऊन सुद्धा आजही त्यांना घरासाठी वणवण भटकावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांनी ( Mill workers Agitation Mumbai ) आज (रविवारी) महाराष्ट्र दिन आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याच औचित्य साधून सरकार विरोधात निषेध आंदोलन केले. मुंबईतील हुतात्मा चौकात ( Hutatma Chowk Mumbai ) कामगारांनी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.
सरकारचे प्रयत्न असफल :मुंबई शहर आणि उपनगरातील बंद कापड गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबत 2001 मध्ये अध्यादेशही काढण्यात आला. बंद गिरण्यांच्या एकूण जागेपैकी एक तृतीयांश जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी देण्याची तरतूद करण्यात आली. या जमिनी घरे उभारून त्याचे वाटप करण्याची जबाबदारी सरकारने म्हाडावर सोपवली. त्यानुसार म्हाडाने कामगारांकडून ३ वेळा अर्ज मागवले. सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणे अशक्य असल्याने राज्य सरकारने एमएमआरडीए मार्फत सुद्धा उभारण्यात आलेल्या भाडेतत्वावरील घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय घेतला. परंतु आजही हे गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत.