मुंबई -मुंबईत पावसाळ्यात दादर हिंदमाता ( Dadar Hindmata ) येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. वाहतूकीचा खोळंबा होऊन मुंबई ठप्प होते. यासाठी पालिकेने भूमिगत टाक्या उभारून पाण्याचा निचरा केला जात आहे. याच धर्तीवर अंधेरी येथील मिलन सबवे येथील ( Milan Subway ) पाण्याचा निचरा केला जाणार आहे. त्यासाठी पालिका ३३ कोटी रुपये खर्च करणार आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
हिंदमाता फॉर्म्युल्याचा वापर -
मुंबईतील हिंदमाता येथे पावसाळ्यात दरवर्षी तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येला मुंबईकरांना सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत येथील प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्यानंतर येथील समस्या हळू हळू दूर होते आहे. हिंदमाताप्रमाणे मिलन सबवे येथेही सखल भाग असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पाणी तुंबते. ही समस्या दूर करण्यासाठी येथे हिंदमाता फॉर्म्युला राबवला जाणार आहे. भूमिगत टाक्या बनवून पाण्याचा निचरा करण्याच्या हिंदमाता फॉर्म्युल्याचा वापर मिलन सब-वेच्या ठिकाणी करण्यात येत आहे. ज्या कंत्राटदाराने हिंदमाता परिसराचे काम केले होते, त्या कंत्राटदारावरच मिलन सब-वेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी सुमारे ३३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
३३.९० कोटी रुपयांचे कंत्राट -
पश्चिम उपनगरातील मिलन सबवेवर पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेकवेळा वाहनांचा मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे हिंदमाताच्या धर्तीवर मिलन सबवे मधील पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मिलन सब-वेमधील तुंबणाऱ्या पाण्यासाठी के-पश्चिम विभागातील आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरुपात पाणी साठवण्यासाठी साठवण टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. सब-वेमध्ये साचणारे पाणी साठवण टाकीपर्यंत वाहून नेण्यासाठी १२०० मिमी. व्यासाची पावसाळी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा वेगाने होईल आणि मिलन सब-वेमधील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. या भूखंडावर बांधण्यात येणारी २० हजार लिटर घनमीटर म्हणजे २ कोटी लिटर क्षमतेची साठवण टाकी आरसीसी स्लॅबने आच्छादित केली जाणार आहे. येथील भूखंडाची जागा नियमित वापरासाठी असेल, असे पर्जन्य जलवाहिनी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या कामासाठी मागवलेल्या निविदेमध्ये देव इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरली. या कंपनीने महापालिकेच्या अंदाजापेक्षा २० टक्के कमी दरात काम मिळवले आहे. त्यामुळे निव्वळ कंत्राट २७.७३ कोटी आणि विविध करांसह ३३.९० कोटी रुपयांमध्ये कंत्राट दिले जाणार आहे.
वाहतूक कोंडी होणार कमी -
मिलन सबवे येथील कामासाठी पात्र ठरलेल्या देव इंजिनिअर्स या कंपनीने यापूर्वी हिंदमाता उड्डाणपुलाखाली संत झेविअर्स मैदानातील साठवण टाकीचे बांधकाम व इतर कामे केली आहेत. या कामाच्या आधारे या कंपनीला मिलन सब-वेचे काम देण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथील पाणी तुंबून होणारी वाहतूक कोंडी दूर होईल, असा विश्वास संबंधित पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा-Namami Gange Scheme : 'नमामि गंगे'साठी सहा वर्षात 482 कोटी खर्च; मात्र, गंगेची स्थिती तशीच - माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर