महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई: ऑक्सिजनअभावी १६८ कोरोना रुग्णांचे दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतर - oxygen supply in Mumbai hospitals

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच ६ समन्वय अधिकारी नेमल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Migration of corona patient
कोरोना रुग्णांचे दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतर

By

Published : Apr 17, 2021, 11:50 PM IST

मुंबई- देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ रुग्णांना ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा असलेल्या रुग्णालयात तसेच कोविड सेंटरमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यात आले आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे. तसेच ६ समन्वय अधिकारी नेमल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-अबब! अडीच लाख बिल, आकडा ऐकून कोरोना रुग्णाने बाथरूमच्या खिडकीतून मारली उडी

१६८ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविले -
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज भासते. वांद्रे येथील भाभा रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालय या सहा रुग्णालयातून मिळून १६८ रुग्णांना इतर रुग्णालये व कोरोना सेंटरमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

हेही वाचा-भूक न लागणे, थकवा येणे, डोळे लाल होणे कोरोनाची नवी लक्षणे -डॉ. संजीव ठाकूर

परिस्थितीवर बारकाईने लक्ष -
ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच सक्रियपणे यंत्रणेला मार्गदर्शन करत आहेत. रुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आणि त्यांचे सहकारी, संपूर्ण आरोग्य विभाग रात्रंदिवस कार्यरत आहेत. ऑक्सिजन उपलब्धतेसह कोविड बाधितांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासन आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा-पुणे : मागणी वाढल्याने ऑक्सिजनच्या दरात वाढ

६ समन्वय अधिकारी नियुक्त -
महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखता यावा, म्हणून अन्न व औषध प्रशासन तसेच प्राणवायू उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने सहा समन्वय अधिकारी नियुक्त केले जाणार होते. १६८ रुग्णांना ऑक्सिजन तुटवड्यानंतर हलवावे लागल्यानंतर पालिकेने ६ समन्वय अधिकारी नियुक्त केले आहेत. भविष्यातही प्राणवायू पुरवठ्यात कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे.

राज्यात १५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज-

राज्यात दररोज ६० ते ६३ हजार नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. यात ऑक्सिजनची गरज लागणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळेच पहिल्या लाटेत जिथे दिवसाला राज्यात ८०० ते ८५० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता, तिथे आता दुसऱ्या लाटेत ही मागणी थेट प्रतिदिन १५०० मेट्रिक टनवर गेल्याची माहिती डी आर गहाणे, सहआयुक्त, (औषध), मुख्यालय, अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details