मुंबई -रेल्वेतून जाताना प्रवाशांनी मास्क घातला नसेल तर मोठी कारवाई रेल्वे विभागाने सुरू केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने 14 हजार 62 विना मास्क असलेल्या प्रवाशांकडून तब्बल 23 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
14 हजार प्रवाशांकडून 23 लाख रुपयांचा दंड वसूल, मध्य पश्चिम रेल्वेत विनामास्क प्रवाशांवर मोठी कारवाई सुरू - Railway action on unmasked passengers
मध्य पश्चिम रेल्वेत विना मास्क प्रवाशांवर मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. रेल्वे 14 हजार प्रवाशांकडून 23 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वे 871 प्रवाशांवर कारवाई-
रेल्वे प्रशासनाने आता कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रवासादरम्यान किंवा रेल्वे परिसरात मास्क न लावणाऱ्या प्रवाशांवर 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यांची 17 एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी आदेश धडकल्यानंतर मुंबई आणि सोलापूर विभागात 40 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, मुंबई, सोलापूर, पुण पाचही विभागात विभागात 170 मास्क न घातलेल्या प्रवशांवर कारवाई करण्यात आली होती. मध्य रेल्वेकडून 17 ते 25 एप्रिलपर्यंत विनामास्क असलेल्या 871 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार 450 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.
कारवाईमुळे प्रवाशांचे धाबे दणाणले-
पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून 1 एप्रिल ते 25 एप्रिल 2021पर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मुंबई, बडोदा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर या सहा झोनमध्ये गेल्या 25 दिवसांत 13 हजार 191 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेने 14 हजार 62 विनामास्क असलेल्या प्रवाशांकडून तब्बल 23 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामुळे प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत. प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर, हातांची स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करावा यासाठी जनजागृतीसह प्रवाशांना आवाहन केले जात होते. मात्र, प्रवासी हे आवाहन फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र होते. त्यावरून ही कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.