म्हाडा उभारणार सोमय्या मैदानावर 1200 बेडसचे जम्बो कोविड सेंटर, आठवड्याभरात कामाला सुरुवात - MHADA open Jumbo Covid Center
मुंबईत नवीन चार कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. यातील सोमय्या मैदान, चुनाभट्टी येथील सेंटरच्या उभारणीची जबाबदारी म्हाडाकडे देण्यात आली आहे.
मुंबई - दुसऱ्या लाटेत मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बेडस, वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ही बाब लक्षात घेत मुंबईत नवीन चार कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. यातील सोमय्या मैदान, चुनाभट्टी येथील सेंटरच्या उभारणीची जबाबदारी म्हाडाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार 1200 बेड्सचे सुसज्ज सेंटर उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. तेव्हा पुढील आठवड्यात कामास सुरवात करत महिन्याभरात काम पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याची माहिती सुनील जाधव, मुख्य अभियंता, म्हाडा यांनी दिली आहे.
मुंबईत पहिल्यांदाच म्हाडाकडून कोविड सेंटरची उभारणी
मार्चमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासुन रुग्ण संख्या घटत आहे. मात्र तरीही सक्रिय रुग्ण पाहता बेडस, आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळ कमी पडत आहे. तर महत्वाचे म्हणजे सप्टेंबरमध्ये देशात दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तेव्हा या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आरोग्य सुविधा वाढवणे गरजेचे आहे असे म्हणत सरकारने मुंबईत चार नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग, सोमय्या मैदान, मालाड आणि अन्य एका ठिकाणी असे चार सेंटर उभारले जाणार आहेत. त्यानुसार मालाड येथील 2200 बेडसच्या कोविड सेंटरची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडे सोपवण्यात आली आहे. तर आता सोमय्या मैदानावर म्हाडा 1200 बेडसचे सेंटर उभारणार आहे. सरकारकडून ही जबाबदारी म्हाडाला देण्यात आली आहे. दरम्यान मिरा-भाईंदर येथे एक आणि कळवा येथे एक असे दोन कोविड सेंटर म्हाडाने उभारली आहेत. तर आता म्हाडा पहिल्यांदाच मुंबईत जम्बो कोविड सेंटर उभारणार आहे.
55 कोटी खर्च अपेक्षित
सोमय्या मैदानातील 1700 चौ मीटर जागेवर 1200 बेडसचे कोविड सेंटर असणार आहे. या सेंटरच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आली आहे. आता तीन-चार दिवसांत निविदा अंतिम करत आठवड्याभरात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर महिन्याभरात काम पूर्ण करत हे सेंटर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. दरम्यान या कामासाठी 55 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तर कमी खर्चात अधिकाधिक सुसज्ज सेंटर उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे सद्या रुग्णालयात वा कोविड सेंटरमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा कोणत्याही घटना येथे घडू नये यादृष्टीने सर्व परवानगी घेत आणि त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करत सेंटरची उभारणी करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले आहे.
1000 ऑक्सिजन तर 200 आयसीयु बेड्स असणार
1700 चौ मीटर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या सेंटरमध्ये एकूण 1200 बेड्स असणार आहेत. यातील 1000 बेडस ऑक्सिजन तर 200 बेड्स आयसीयु असणार आहेत. खुल्या मैदानात हे सेंटर उभारण्यात येणार असल्याने पावसाळ्यात यात पाणी साचू नये यादृष्टीने याची रचना असणार आहे. तर येथे रुग्णांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सद्या मुंबईसह देशात ऑक्सिजनचा मोठा तूटवडा आहे ही बाब लक्षात घेत येथे ऑक्सिजनच्या मोठ्या टाक्या ही लावण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. एकूणच हे सेंटर सेवेत दाखल झाल्यास ही मोठी सोय ठरणार आहे.