मुंबई -बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना सणासुदीत घरांची लॉटरी लागणार आहे. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील प्रस्तावित पुनर्वसन इमारतीतील 269 घरांसाठी उद्या (गुरुवारी) दुपारी साडेबारा वाजता लॉटरी काढण्यात येणार आहे.
गेल्या महिन्याभरापासून बीडीडी चाळ पुनर्विकास लॉटरीची चर्चा सुरू होती. पण लॉटरीला मुहूर्त काही लागत नव्हता. मात्र, लॉटरीसाठी उद्याचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे नायगावमधील पात्र आणि सद्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत झालेल्या 269 रहिवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.
रहिवाशांना घराची संपूर्ण माहिती कळू शकणार
वरळी, नायगाव आणि ना. म.जोशी मार्ग बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पानुसार रहिवाशांची पात्रता निश्चित करत पात्र रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येत आहे. तर राज्य सरकारच्या निर्णयानुसार प्रकल्प पूर्ण होण्याआधीच म्हणजे पुनर्वसित इमारतीचे बांधकाम होण्याआधीच घरांची लॉटरी काढत पात्र रहिवाशांना घराची हमी देण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवाशांना टॉवरमध्ये आपले घर कोणत्या इमारतीत व कितव्या मजल्यावर हे समजू शकणार आहे. तसेच रहिवाशांना घराचा क्रमांक कळू शकणार आहे. त्यामुळे एकार्थाने पुनर्विकासात रहिवाशांना घराची हमी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.