मुंबई -सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाची ओळख आहे. मात्र, मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई बोर्डाची एक सुद्धा लॉटरी निघाली नाही. कोकण मंडळाची नऊ हजार घरांची लॉटरी निघाली होती. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे, मुंबई बोर्डाची लॉटरी कधी निघणार याची. पुढील वर्षी सुरुवातीलाच पाच हजार घरांची लॉटरी ( MHADA lottery ) निघण्याची शक्यता आहे. यामुळे नववर्षांत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -Assembly Winter Session : बाप आजारी असताना विचारता का..? मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका करणाऱ्या विरोधकांवर आव्हाडांचा संताप
लवकरच अधिकृत घोषणा
म्हाडा कमी किमतीत घरे उपलब्ध करून देत असते. मागील दोन वर्षांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी निघाली नाही. आगामी वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई मंडळ सुमारे साडे पाच हजार घरांची सोडत काढण्याच्या विचारात आहे. या सोडतीमध्ये गोरेगाव, अॅनटॉप हिल, दक्षिण मुंबईतील घरांचा समावेश असणार आहे. या घरांची किंमत निश्चिती आणि इतर कामे पूर्ण झाल्यानंतर सोडतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कोकण मंडळानंतर आता मुंबई मंडळाची सोडत
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर म्हाडाच्या कोकण मंडळाची साडेनऊ हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीला मोठा प्रतिसाद लाभला. काही भागातील घरे सोडली तर, अनेक घरांना हजारो अर्ज आली होती. यावर्षी मुंबई मंडळाकडे घरे उपलब्ध नसल्याने सोडत काढण्यात आली नाही. मात्र, कोकण मंडळाच्या सोडतीनंतर आता मुंबई मंडळ सोडत काढण्याच्या तयारीला लागले आहे.
कोणत्या भागात असणार घरे
फेब्रुवारीमध्ये काढण्यात येणाऱ्या लॉटरीमध्ये पहाडी गोरेगाव, अॅनटॉप हिल, दक्षिण मुंबईतील घरांचा समावेश करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील सुमारे साडेचार हजार घरे पंतप्रधान आवास योजनेतील असून ते अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. अॅनटॉप हिल येथील 400 घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत. तर, दक्षिण मुंबईतील 70 ते 80 घरे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील असणार आहेत. यासह मंडळातील विविध भागांतील घरांचा समावेश या सोडतीमध्ये करण्यात येणार आहे. या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
कोकण मंडळांची ही सोडत
नवीन वर्षामध्ये सर्वसामान्यांना घर घेण्याची नामी संधी उपलब्ध करून देणार आहे. फेब्रुवारीमध्ये मुंबई मंडळाची लॉटरी निघाल्यानंतर मार्चमध्ये कोकण मंडळाची लॉटरी निघू शकते. यामध्ये 1 हजार घरांची सोडत निघणार असल्याची माहिती अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
हेही वाचा -शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण