मुंबई - पोलिसांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न गंभीर असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत. यात आता म्हाडानेही पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आज म्हाडाने पालघर पोलीस दलातील 109 पोलिसांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील 109 घरांचे वितरण आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
विरार-बोळींजमधील 186 घरे पोलिसांसाठी राखीव-
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न गंभीर आहे. सद्या पोलीस ज्या पोलीस वसाहतीत राहतात. त्या वसाहतीची दुरवस्था झाली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत पोलिसांचे कुटुंब राहते. त्यामुळे पोलिसांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याची मागणी सातत्याने होत आहे. तर पोलिसांसाठी स्वतंत्र गृहप्रकल्प राबवण्यात येत आहेत. अशात आता म्हाडानेही पोलिसांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार विरार-बोळींज गृहप्रकल्पातील 186 घरे पालघर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना देण्याचा ठराव 4 जानेवारी 2019 मध्ये मंजूर करण्यात आला होता. विरार-बोळींज प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 3, इमारत 10 मधील ही घरे आहेत.
27 लाखांत मिळाले घर-
म्हाडाचे नवीन घर हे केवळ लॉटरी पध्दतीनेच वितरित होते. पण ही 186 घरे विशेष तरतूद करत पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अर्ज सादर झालेल्याना घर मिळाले आहे. दरम्यान 2019 मध्येच कोकण मंडळाने 186 घरांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार यासाठी 109 अर्ज सादर झाले. या अर्जानुसार या कर्मचाऱ्यांची घरे निश्चित करत आज त्यांना घरांचे वितरण करण्यात आले. आज प्रातिनिधिक स्वरूपात काही पोलिसांना प्रथम सूचना पत्र देण्यात आले. तर उर्वरित पोलिसांना लवकरच प्रथम सूचना पत्र पाठवण्यात येणार आहे.